Ad will apear here
Next
निसर्गरम्य कोडागू आणि मडिकेरी
कोडागू
धुक्याची ओढणी घेऊन हिरवा शालू पांघरलेली सह्याद्रीची गिरिशिखरे, फेसाळणारे धबधबे, हरतऱ्हेच्या पक्ष्यांची किलबिल, मुक्तपणाने फिरणारी १६ प्रकारची विविध जंगली श्वापदे, हवापालटासाठी ‘मडिकेरी’सारखे गिरिस्थान... हे वर्णन आहे कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे...कूर्ग हेही याच जिल्ह्याचे नाव. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात त्यातील काही पर्यटनस्थळे पाहू या.
......

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कर्नाटकच्या समुद्रकिनारी फिरलो. या भागात जाऊ या पूर्वेकडे सह्याद्रीच्या कुशीतील वनश्रीने नटलेल्या कोडागू जिल्ह्यात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून कोडागू इतिहासाच्या नोंदीत आहे. तेथे त्या वेळी कदंबांचे राज्य होते. इ. स. ६००पर्यंत त्यांची सत्ता होती. दक्षिण भागात गंगा राजवट होती. गंगा राजांनी कोडागूचा ताबा घेतला व त्यांनी ११व्या शतकापर्यंत राज्य केले. त्यानंतर चोळ राजवट आली. १२व्या शतकात होयसळ राजवट आली. १४व्या शतकात कोडागू विजयनगरच्या ताब्यात गेले. त्यानंतर विजयनगरची सत्ता कर्णबहू या स्थानिक सरदाराकडे गेली. त्यानंतर तिथे १७व्या शतकापर्यंत नायक होते. नंतर कोडागूचा ताबा टिपूकडे गेला आणि १८व्या शतकापासून भारत स्वतंत्र होईपर्यंत हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता.

मडिकेरी
मडिकेरी : हे कोडागू जिल्ह्यातील आणि दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध गिरिस्थान आहे. पश्चिम घाट पर्वतरांगेत वसलेले जंगल आणि भात खाचरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव कॉफी मळ्यांसाठीही ओळखले जाते. कॉफीच्या मळ्यांत अनेक ठिकाणी ‘होम-स्टे’ सुविधा उपलब्ध आहे. १७व्या शतकातील मडिकेरी किल्ला ही वारसा वास्तू येथे आहे. बाजूला ओंकारेश्वराचे म्हणजेच भगवान शिव यांना समर्पित असलेले प्राचीन मंदिर आहे. मंदिराची खासियत अशी आहे, की त्याची निर्मिती गॉथिक व इस्लामिक शैलीचे मिश्रण दर्शवते. कूर्गचे हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भक्त नियमितपणे येतात. येथे वेगवान वारे वाहतात. आसपास मसाल्याच्या बागा आहेत.

मडिकेरी किल्लामडिकेरी किल्ला : हा किल्ला प्रथम १७व्या शतकात मुदुराजाने बांधला होता. त्याने किल्ल्यामध्ये एक राजवाडा बांधला. टिपू सुलतानाने ग्रॅनाइटमध्ये पुनर्बांधणी केली व या जागेला जाफाराबाद असे नाव दिले. याच्या प्रवेशद्वारावर दोन दगडी हत्ती आहेत. १७९०मध्ये दोडदावीर राजेंद्र यांनी किल्ल्याचा ताबा घेतला व काही बदल केले.

सेंट मार्कस चर्चसेंट मार्कस चर्च :
हे चर्च १८५९मध्ये इस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी व मद्रास सरकारद्वारे वित्तपुरवठा घेऊन बांधण्यात आले. हे चर्च मद्रासच्या (चेन्नई ) बिशपच्या आधिपत्याखाली होते. ब्रिटिश सरकार व तत्कालीन धर्मगुरू यांच्यामध्ये याच्या मालकीवरून वाद झाला होता. त्या वेळी व्हाइसरायने चर्च मद्रास सरकारचे असल्याचा निर्वाळा दिला. १९४७मध्ये हे चर्च कर्नाटक सरकारच्या ताब्यात घेतले गेले. तेथे आता संग्रहालय आहे. हिंदू आणि जैन शिल्पकला, देवी-देवता, स्मृतिचिन्हे आणि पुरातन शस्त्रे इत्यादी ऐतिहासिक वस्तू वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

राजाची सीटराजाची सीट :
निसर्ग, तसेच सूर्यास्त बघण्यासाठी राजाने येथे खास चौथरा बनवून घेतला होता. तो राजाची सीट म्हणून ओळखला जातो. तेथे एक बगीचाही आहे. सायंकाळी येथे भरपूर गर्दी होते.

अॅबे फॉल्सअॅबे फॉल्स : मडिकेरीपासून आठ किलोमीटरवर हा धबधबा असून, तो कॉफी आणि मसाल्याच्या मळ्यांच्या परिसरात आहे. एक ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी जेसी हिचे नाव पूर्वी या धबधब्याला देण्यात आले होते. धबधब्याच्या समोरच एक झुलता पूल बांधण्यात आला आहे. सध्या हा परिसर खासगी मालकीचा आहे.

दुबेरे एलिफंट कॅम्पदुबेरे एलिफंट कॅम्प : दुबेरे एलिफंट कॅम्प हे कावेरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हत्ती प्रशिक्षणाचे एक केंद्र आहे. दुबेरे हे नदीचे एक नैसर्गिक बेट आहे. येथील हत्ती म्हैसूरच्या प्रसिद्ध दसरा मिरवणुकीत मिरवले जातात. एलिफंट कॅम्पजवळ रिव्हर राफ्टिंगचाही आनंद घेता येतो. स्थानिक लोक ही व्यवस्था बघतात. येथे आसपासच्या जंगलात रानडुकरे, हरणे, बिबटे आणि नदीमध्ये मगरीही पाहायला मिळतात. जवळच एका पुरातन मंदिराचे अवशेषही आहेत. हे ठिकाण मडिकेरीपासून २९ किलोमीटरवर आणि कुशीनगरपासून १५ किलोमीटरवर आहे.

नाम्ड्रॉलिंग नयोंगपा मठ
कुशलनगर : स्थानिक लोकांच्या मते, हैदरअलीने त्याचा पुत्र टिपूच्या जन्माची बातमी या जागी आलेला असताना ऐकली. त्यामुळे आनंदाची नगरी या अर्थाने त्याने ‘कुश्याल नगरी’ असे नाव या नगरीला दिले; पण प्रत्यकक्षात हैदर येथे १७६०मध्ये आला होता व टिपूचा जन्म १७५०मध्ये झाला होता. इंग्रजांनी कूर्ग जिंकल्यावर कर्नल जेम्स स्टुअर्ट फ्रेझर कूर्गमधील पोलिटिकल एजंट म्हणून हजर झाले. त्यांच्या नावावरून हे गाव फ्रेझरपेट म्हणून ओळखले जायचे. येथील नाम्ड्रॉलिंग नयोंगपा मठ हे जागतिक तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वांत मोठे शिक्षण केंद्र आहे.

कावेरी निसर्गधामकावेरी निसर्गधाम : कावेरी निसर्गधाम कुशलनगरपासून दोन किलोमीटरवर कावेरी नदीच्या काठावर वसलेले हे एक सुंदर असे सहलीचे ठिकाण आहे. हँगिंग ब्रिजवरून त्यावर प्रवेश करता येतो. पेडल बोट सेंटर, झाडावर राहण्यासाठी मचाण व्यवस्था, हत्ती सफारी आणि हरीण अभयारण्य ही कावेरी निसर्गधाममधील आकर्षणे आहेत.

ब्यालुकुप्पे हस्तकला केंद्रब्यालुकुप्पे हस्तकला केंद्र : हे केंद्र १९६१ साली स्थापन झाले. तिबेटियन शरणार्थी वसाहतींचे स्थान, तसेच अनेक तिबेटी बौद्ध मठ येथे आहेत. कुशलनगरपासून जवळच हे केंद्र आहे.


भागमंडलाभागमंडला : कनिका, कावेरी आणि सुज्योती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणास भगुंदेश्वर क्षेत्र असेही म्हटले जाते, पूर्वजांसाठी पिंडदान करण्याकरिता या ठिकाणी भाविक येतात. येथे गणपती, सुब्रह्मण्य आणि विष्णू यांना समर्पित अशी तीन मंदिरे आहेत. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरातील हजारो दिवे लावले जातात व दीपोत्सव साजरा केला जातो. हे ठिकाण मडिकेरीपासून ३९ किलोमीटर अंतरावर आहे.

ब्रह्मगिरी
ब्रह्मगिरी : ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. कावेरीच्या उगमस्थानी पोचल्यावर अनेक लोक, विशेषत: तरुण ब्रह्मगिरी शिखरावर ट्रेकिंगसाठी जातात. येथे सप्तऋषींनी ध्यान केले होते, असे म्हणतात.

इरुप्पू फॉल्सइरुप्पू फॉल्स : इरुप्पू हा कूर्गचा सर्वांत लोकप्रिय धबधबा आहे. नागरहोल राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेले इरुप्पू हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ आहे. टेकडीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी पक्के डांबरी रस्ते आहेत. तेथून बांधलेल्या पायऱ्यांवरून धबधब्यापर्यंत जाता येते. वन विभागाने आसने बसविली आहेत. तिथून पर्यटक निसर्ग मोकळेपणाने पाहू शकतात. इरुप्पू डोंगराला धार्मिक महत्त्वही आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते, की श्रीराम आपल्या वनवासात या जंगलात राहिले होते. श्री लक्ष्मणाने बाण मारून धबधबा निर्माण केला, अशी भाविकांची समजूत आहे. इरुप्पू धबधबा असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी रामेश्वर मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, या मंदिराचे शिवलिंग हे भगवान राम यांनी स्वतःच तयार केले होते.

कक्काबेकक्काबे : हे पर्वत शिखर मडिकेरीपासून ४५ किलोमीटरवर आहे. आसपासच्या जंगलांमध्ये हरणे, खवले मांजर आणि अनेक प्रकारचे पक्षी आढळतात.




तळकावेरी
तळकावेरी : कावेरी नदीचा उगम येथे होतो. कावेरीमाता मंदिरही येथे आहे. अगस्ती ऋषी येथे राहिले होते. हे तीर्थक्षेत्र मानले जाते. १२७६ मीटर उंचीवरील हे ठिकाण असून, भागमंडलापासून आठ किलोमीटरवर आहे.

हरंगी धरण
हरंगी धरण : कावेरी नदीची उपनदी असलेल्या हरंगी नदीजवळ डोंगराळ भागात बांधलेल्या या धरणामुळे कोडागू परिसराचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. हरंगी नदी कोडागू येथे पश्चिम घाटातील पुष्पकगिरी टेकडीतून उगम पावते. कुशलनगरपासून नऊ किलोमीटरवर आहे.

इगुथप्पा देवरा बेट्टा शिखर : अय्यंगेरी वनातील हे सुंदर ठिकाण आहे. श्री सुब्रह्मण्यमस्वामींचे पवित्र ठिकाण समजले जाते

तडियांदमोल शिखरतडियांदमोल शिखर : हे या भागातील ५७२४ फूट उंचावरील सर्वांत उंच ठिकाण असून, ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. मडिकेरीपासून ४० किलोमीटरवर आहे.



ओंकारेश्वर मंदिर, मडिकेरी

नागरहोल वन्यजीव, पक्षी अभयारण्यनागरहोल वन्यजीव, पक्षी अभयारण्य : नागरहोल राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते. नागरहोल, कल्ल्हाल व थिटीमठी या तीन वनक्षेत्रांचे मिळून हे अभयारण्य झाले असून, म्हैसूर व कोडागू जिल्ह्यात विस्तारले आहे. या अभयारण्यात हत्ती, गवे, वाघ, बिबटे, शेकरू, विविध प्रकारची हरणे, सरडे, तरस, कोल्हे, अजगर, भेकर, लांडगे, खवले मांजर, मुंगूस, विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, आणि नानाविध पक्षी आढळून येतात. एवढी प्राणिसंपदा फारच क्वचित एका ठिकाणी आढळून येते.

मल्लाला फॉल
मडिकेरीच्या आसपास : करापूर येथील वनक्षेत्र, मल्लाला फॉल, कुमारधारा फॉल, पुष्पागिरी अभयारण्य, तळकावेरी अभयारण्य, ५६२५ फूट उंच पुष्पागिरी शिखर ही आणखी काही पर्यटनस्थळे आहेत.

कसे जायचे?

मडिकेरी म्हैसूरपासून १०० किलोमीटर व मंगळूरपासून १९२ किलोमीटरवर आहे. जवळचा विमानतळ व रेल्वे स्टेशन म्हैसूर येथे आहे. मडिकेरी येथे राहण्यासाठी चांगल्या दर्जाची हॉटेल्स, तसेच कॉफीच्या मळ्यातील होम-स्टे सुविधा उपलब्ध आहे. अनेक जंगल रिसॉर्टही आहेत. डिसेंबर ते मे हा येथे जाण्यासाठी चांगला कालावधी आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

तिबेटी बौद्ध मठ

(निसर्गरम्य कोडागू आणि मडिकेरीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNTBS
 डॉ हडप सर
'राह पकड तू एक चला चल ' हा लेख खुप अप्रतिम लिहिला आहे

तुमचे आज पर्यतचे 'बाइट्स ऑफ इंडिया 'वरील स्मरणचित्रे'या र्चित्रकारां वरील लेखांची सिरीज मी वाचत आलेलीे आहे सर्वच लेख खुप छान लिहीलेलेआहेत3
 कूर्गचे फारच छान वर्णन. आम्ही उभयता तिथे नुकतेच जाऊन आलो होतो, त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या.
गर्दी टाळण्यासाठी आम्ही आफ सीझनला फेब्रुवारीत गेलो होतो आणि नशिबाने त्याच दिवशी तिथे जोरदार पावसाने आमचे स्वागत केले. त्यामुळे मजा आली.1
 Very nice information , thanks.
Similar Posts
ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेला चित्रदुर्ग ‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेले चित्रदुर्ग शहर आणि किल्ल्याची, तसेच आजूबाजूच्या पर्यटनस्थळांची...
बेंगळुरूमधील उद्याने आणि बरेच काही... बेंगळुरू हे प्रामुख्याने उद्यानांचे आणि तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच येथे अनेक संग्रहालयेसुद्धा आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण बेंगळुरूचा संक्षिप्त इतिहास, तसेच तेथील काही ठिकाणांबद्दल पाहिले. आजच्या भागात पाहू या येथील उद्याने, संग्रहालये आणि अन्य काही ठिकाणांबद्दल...
निसर्गरम्य कारवार, गोकर्ण महाबळेश्वर सदाहरित वृक्षांनी बहरलेला सह्याद्री, त्यातील श्वापदे, सुंदर जलप्रपात, झाडीने किनारे झाकलेल्या खाड्या, निळाशार समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा भटकंती करणाऱ्यांना खुणावत आहेत. डोसे-उडीद वडे-उत्तप्पे, पापलेट, सुरमई, बांगडे खवय्यांना भुरळ घालत आहेत. हंगामानुसार अननस, फणस, काजू, नारळ, शहाळी अशी मधुर फळे आहेतच
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language